Friday, 23 October 2015

चंद्र


कधी एकल्याशा रात्री
मनी, गोठलेल्या गात्री
मायेने घाली चंद्र
पांघरूण...

चंद्र रमतो गाण्यात
कधी गोष्टीच्या पानात
निंबोणीच्या झाडामागे
निजे चंद्र...

चंद्र आभाळी प्रकटे
चुकलेल्या सख्यासम
अन हितगुज करी
मूकपणे…

चंद्र उतरे पाण्यात
करी लपंडाव कधी
निथळत किनाऱ्याशी
शांत बसे…

चंद्र तिच्याही डोळ्यांत
चंद्र त्याच्याही समोर
त्याने तिने पाहिलेला
चंद्र एक…

दमलेल्या पाऊलांना 
उध्वस्त जाणिवांना
समंजस चंद्र कसा
कुरवाळितसे…

चंद्र इतुक्या जवळ
चंद्र इतुका आपुला
तरी कोसो मैल कसा
दूर चंद्र? 

-ऋचा
  

Monday, 31 August 2015

एकदाच…

येता तुझी आठवण
सुने सुने होई मन
किर्र किर्र चांदवा नि
झुरे एकटाच घन

जळे जेव्हा सांजवात
तुटे आत अंतरात
तुझी आठवण येई
मुख न्हाई आसवांत

का रे गेलास सोडून
मला इथे एकटीला
आता दु:खाची सोबत
अन जीव खोळंबला

जीव मागतो मरण
एकाकी हा विटलासे
कसे पडले उलटे
माझ्या नशिबाचे फासे

काय दैवात लिहिले
ते का कधी चुकायचे?
इथे जगता जगता
पुन्हा पुन्हा मरायचे

कधी वाटे दूरदेशी
रमेल का तुझे मन?
का तुलाही आठवेल
चांदवा नि शुभ्र घन?

येशील का एकदाच
माझ्याकडे परतून
तुला डोळाभर पुन्हा
एकदाच मी पाहीन

साठवून तुला आत
डोळे मग मिटतील
सारे अश्रूही मृत्यूच्या
कवेतच झरतील


--
ऋचा

















Tuesday, 25 August 2015

सांग ना ….



गोजिरेसे स्वप्न माझे ज्या क्षणी निसटून गेले

अवस होती आसुरी की फितुर मग झाला प्रहर


दो मनांचे माझिया निश:ब्द यावर द्वंद्व होई

 कोण चुकले जीभ का ही जहरीली झाली नजर









 

 

 

 

  

कोण चुकले काय चुकले या क्षणी सोडून दे तू 

सांग ना जाशील का रे सोडूनी माझे शहर?


उगवली संवेदनेची तार जी हृदयामध्ये 

छेड ना रे वेदनेची दौडु दे आता लहर


सांज ढळता पापणी ओलावली का सांग ना 

पाउले की थबकली वेशीवरी त्या सांग ना 

घेतलेले सोबतीचे वचन आठव एकदा 

एकदा परतून यावे वाटले का सांग ना

--ऋचा 

Tuesday, 5 May 2015

अपरिहार्य..

अपरिहार्य.. 


ऋतुंचीच रुंजी 
ऋतुंना नकोशी 
तरीही बदल ते 
अपरिहार्य.. 

कितीही म्हणा हे
मन मुक्त पक्षी 
परी पिंजरासे 
अपरिहार्य..  

कविता पोटभर 
जरी रोज सुचल्या 
शमवणे क्षुधासे 
अपरिहार्य.. 

किती वेड हे 
अंतरी खोल दडले 
शहाणे मुखवटे 
अपरिहार्य.. 

मुक्याने जरी 
बोलणे अर्थपूर्ण 
परी अर्थ शब्दांत 
अपरिहार्य.. 

किती बोलु वाटे 
काळ हा अल्प आहे 
संपणे तयासी  
अपरिहार्य..

- ऋचा बाक्रे