Monday 25 July 2016

रात्र नंतर कलत जाते झोप कशी ती लागत नाही
आठवणींच्या रंगामधला अंधार अंधार वाटत नाही

चार पावलांची खोलीसुद्धा खूप मोठी पोकळी होते
तू नसताना खिडकीशीही जावे असे वाटत नाही

सगळीच स्वप्न नसतो पाहत पूर्ण व्हावीत म्हणून
तू नसताना त्यांच्यातही जीव माझा रमत नाही


समई मंद तेवत असते काजळीभरल्या ज्योतीने
शिणलेल्या माझ्या डोळ्यांना तोही उजेड पेलत नाही


- ऋचा

Friday 1 April 2016

दोन शब्दांची कविता …

शब्दांचीच काठी 
बुडत्या आधार 
करुणेत भिजती 
शब्दफुले... 

ओठांवर येती 
आणि थबकती
नि:शब्द हे शब्द 
भांबावले... 

उसळता लाट 
साचल्या मनाची 
शब्दचि वाहती 
पानांतून… 

पोकळ सांत्वन 
करती पुष्कळ 
आपुल्या शब्दांना 
फसविती… 

काळ बनवितो 
स्मृतींना धुसर 
उरते शब्दांची 
शाई मात्र…

आपल्या पश्चात
भाव जर केला 
वाजवी किंमत 
दोन शब्द…  

         --ऋचा

Wednesday 16 March 2016

बहुधा...


शाळा सुटली... जबाबदाऱ्या झेलल्या... कुठे बिघडलं?
बहुधा बालपण हरवलं होतं ..


खूप राबलो.. घाम गाळला.. हाती शेवटी काही नाही.. कुठे बिघडलं?
बहुधा नशीब रुसलं होतं ..


माया केली.. खूप शिकवलं.. मग मात्र दूर गेली.. कुठे बिघडलं?
बहुधा मुलं मोठी झाली होती …


खंगलं शरीर… मनही विझलं.. कुठे बिघडलं?
बहुधा म्हातारपण जवळ आलं होतं …


तीही गेली.. श्वास थांबला…कुठे बिघडलं?
बहुधा आयुष्य सरलं होतं.


- ऋचा

Monday 1 February 2016

मज उद्या सोडून सारे जायचे आहे.....

टाकतो देऊन सारे मूर्त जे माझ्याकडे..  सूर्यही  सोडून किरणे चालला क्षितिजाकडे..

कालच्या साऱ्या क्षणांची मागतो आता क्षमा..  पळभरी  गुंतूनी इतिहासात केले ज्या जमा..

पावलांनी  पार केली अंतरेच्या अंतरे..  माणसांची कैकदा केली खरी भाषांतरे..

आर्जवांचे पर्व दूरी सारतो आहे..  प्राक्तनाचा हात धरुनी चालतो आहे..

मोकळे उतरुनी ओझे व्हायचे आहे..   मज  उद्या सोडून सारे जायचे आहे..

                                                                                    -ऋचा 


Friday 23 October 2015

चंद्र


कधी एकल्याशा रात्री
मनी, गोठलेल्या गात्री
मायेने घाली चंद्र
पांघरूण...

चंद्र रमतो गाण्यात
कधी गोष्टीच्या पानात
निंबोणीच्या झाडामागे
निजे चंद्र...

चंद्र आभाळी प्रकटे
चुकलेल्या सख्यासम
अन हितगुज करी
मूकपणे…

चंद्र उतरे पाण्यात
करी लपंडाव कधी
निथळत किनाऱ्याशी
शांत बसे…

चंद्र तिच्याही डोळ्यांत
चंद्र त्याच्याही समोर
त्याने तिने पाहिलेला
चंद्र एक…

दमलेल्या पाऊलांना 
उध्वस्त जाणिवांना
समंजस चंद्र कसा
कुरवाळितसे…

चंद्र इतुक्या जवळ
चंद्र इतुका आपुला
तरी कोसो मैल कसा
दूर चंद्र? 

-ऋचा